Thursday, 7 April 2016

बाहुबलीला पुरस्कार आणि काहींची पोटदुखी

बाहुबलीला पुरस्कार आणि काहींची पोटदुखी


मी आजवर बाहुबलीबद्दल लिहायचं मुद्दामच टाळलं होतं. भारतीय सिनेमाच्या इतिहासातील या ऐतिहासिक ठरू शकणार्‍‍या सिनेमाबद्दल तथाकथित बॉलीवूड आणि स्वघोषित बुद्धिजीवींची काय प्रतिक्रिया येते याची मला उत्सुकता होती. आणि सांगायला अत्यंत आनंद होतो की दोघांनीही मला अजिबात निराश केलं नाही. दोघांनीही 'बाहुबली' सिनेमागृहात चालू असताना व तो उतरल्यावरदेखीलही सतत त्याला अनुल्लेखाने मारण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे बाहुबलीला नुकताच जाहीर झालेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार.

एरवी 'वॉण्टेड' पासून 'रावडी राठोड' पर्यंत, 'सिंघम' पासून 'दृष्यम' पर्यंत साउथच्या सिनेमाची भ्रष्ट नक्कल करण्याइतपत तळ गाठलेल्या बॉलीवूडकर स्टार्सच्या दिवाळखोर बुद्धिला 'बाहुबली'ने न्यूनगंडाचा जबरदस्त झटका दिला होता आणि आहे. बाहुबली व बजरंगी भाईजान हे एकाच वेळी रिलीज झालेले दोन चित्रपट. सुरूवातीला बॉलीवूड व भाईजानच्या काही चमचा वाहिन्यांनी 'भाईजान देगा बाहुबलीसे टक्कर' इ.इ. प्रचार चालवला. पण जसजसा पन्नाशीचा सिंथेटीक भाईजान बॉक्स ऑफिसवर बाहुबलीसमोर धापा टाकू लागला तसे माध्यमांचे प्रायोजित अवसान गळाले. परंतु सर्वसाधारणपणे बॉलीवूड व त्याच्या जीवावर जगणार्‍या सुमार वृत्तवाहिन्यांनी बाहुबलीची केलेली उपेक्षा ही व्यावसायिक असूयेतून केली हे उघड आहे. पण बुद्धिजीवींचे तसे नसते. त्यांच्या बहिष्कार वा पुरस्कारामागे काही वैचारिक कारणे असतात.


ज्याला पूर्वी आर्ट फिल्म म्हणत तशाच पण जरा अधिक मनोरंजक व सुसह्य सिनेमाला आजकाल महोत्सवी चित्रपट म्हणतात (म्हणजे मी म्हणतो). म्हणजे सिनेमा बनवताना तो सिनेमात बनवण्याचा आपला कंडू शमेल व निर्मात्याची निदान गुंतवणूक तरी निघेल या हेतूने बनवायचा पण ते उघडपणे मान्य करायचं नाही. मग चित्रपट देशोदेशीच्या चित्रपट महोत्सवांत प्रदर्शित करायचा. हा जागतिक दौरा आटपून सिनेमाची जरा बरी प्रसिद्धी झाली (त्यातही असा चित्रपट मराठी असेल तर 'मराठमोळ्या' दिग्दर्शकाचा अटकेपार बर्लिन इ.इ. महोत्सवात रीतसर झेंडा वगैरे फडकावून झाला) की मग एखादा व्यावसायिक वितरक शोधायचा आणि सिनेमा गर्दीतील इतरांसारखा प्रवाहात सोडून द्यायचा. मग अशा सिनेमाला जितके महोत्सवी पुरस्कार जास्त आणि जितका बॉक्स ऑफिस जनाधार कमी तितकी संवेदनशील चित्रपटकार म्हणून आपली पाठ थोपटून घ्यायची, बुद्धिमंतांच्या वर्तुळात मिरवून घ्यायचं. ते एक असो.


बाहुबलीबद्दल बुद्धिमंत टीकाकार लोक सिनेमाचे खेळ ऐन भरात असताना काही विशेष बोलत नव्हते. गर्दीतला अजून एक मसालापट म्हणून त्यांनी काणाडोळा केला असावा असा माझा सुरुवातीला समज होता. परंतु ते तसं नसावं अशी शंका मी स्वत: हिंदीतला 'बाहुबली' (जरा उशीराच) पाहिल्यावर आली. चित्रपट पाहिल्यावर पहिला विचार मनात आला तो हाच की, किती हिंदू वातावरण दाखवलंय यात. इतकी उर्दुमुक्त हिंदी ऐकायची सवय हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांना नाही. त्यातही हिरो सुरूवातीलाच महादेवाची पिंड वगैरे उचलून आणतो म्हणजे फारच झालं. त्यामुळे डाव्या, समाजवादी, सेक्यूलर प्रभावाखाली असलेले बुद्धिमंत या सिनेमाची किमान एक मनोरंजक सिनेमा म्हणूनही त्याची स्तुती तर करणारच नाही पण चर्चाही करणार नाहीत असा मला वाटणारा 'शक' हा नंतर 'यकीन'मध्ये बदलत गेला. आणि जसजशे महिने उलटत गेले तशी त्याने 'हकिकत की शक्ल' घेतली. कारण चर्चा जरी करायची म्हटली तरी त्या विषयाला महत्व दिल्यासारखं होतं. म्हणून मी काय होणार याची वाट पाहात बसलो.


अखेर ती घटिका आलीच. बाहुबलीला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच मग लोकांना बोलणे भागच पडले. बाहुबली हा चित्रपट म्हणून वाईट आहे; त्याची पटकथा ढिसाळ आहे; कथा रामायण-महाभारत किंवा अजून कुठल्या लोककथांवरून उचललेली आहे; संकलन गचाळ आहे; तांत्रिक बाजू कमकुवत आहे; विदेशी सिनेमातील दृष्यांची नक्कल केली आहे; संगीत ओरीजिनल नाही; अभिनय चांगला नाही; वेषभूषा सुसंगत नाही इ.इ. कारणांमुळे 'बाहुबली'ला पुरस्कार द्यायला नको होता असा विरोध कोणी केला असता तर एक वेळ समजू शकतं. परंतु मोदीविरोधक बुद्धिमंत व मिडीयाने इथेही मोदीविरोधाची संधी शोधली. याबाबतीत केजरीवालांना बरीच कठीण स्पर्धा आहे.


तर 'हिंदुत्ववादी सरकार केंद्रात आल्यामुळे हिंदू वातावरण असलेल्या, आदर्श पिता, आदर्श माता यासारखी पात्रे असलेल्या 'बाहुबली'ला पुरस्कार मिळाला' असा आरोप पुरोगामी वृत्तपत्रांनी संपादकीय पानांवरून केला. जणू काही सिनेमाकारांनी मे २०१४ नंतर घाईघाईने सिनेमा करायला घेतला आणि आता हे संघी सरकार आपले असेच प्रचारपट आणणार की काय अशीही शंका काहींना आली. पण अशी काही शंका 'नया दौर' सारख्या तद्दन कम्युनिस्ट प्रचारपटांबद्दल घ्यायची नसते हे मला माहीत असल्यामुळे मी काही तसे म्हणत नाही. एकीकडे भारतीय दंतकथा, महाकाव्यात किती नाट्य भरलेय, यावर मुख्य धारेतील लोक चित्रपट काढत नाहीत असा आरोप करायचा मग कोण्या राजामौलीने तसा प्रयत्न केला तर त्यालाच सनातनी ठरवायचं असा हा दुटप्पीपणा आहे. आज बाहुबलीला नाके मुरडणारे उद्या 'द जंगल बुक' प्रदर्शित झाल्यावर त्याचे, त्यातील भारतीय वातावरणाचे कसे गोडवे गातील हे पाहा. कारण उघड आहे, आपला क्लासिक भारतीय न्यूनगंड. जंगल बुकचे लेखक रुडयार्ड किपलिंग होते म्हणजे एक साहेब, कोणी ऐरागैरा राजामौली नव्हे.


काही उपसंपादकांनी आपल्या 'उलट्या चष्म्या'तून बाहुबलीची तुलना 'चांदोबा'शीसुद्धा केली. चांदोबातल्या गोष्टीतील आदर्शवाद, भाबडेपणा यांची थट्टा, आता काय चांदोबालाही साहित्य अकादमी देणार का असे म्हणून करण्यात आली. पण ती करताना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणारा पहिला मराठी चित्रपट 'श्यामची आई' ज्यांच्या मूळ कादंबरीवर आधारित आहे ते आधुनिक महाराष्ट्रातील आदर्शवाद , भाबडेपणा इ.इ. चे आद्य प्रवर्तक व प्रचारक 'गोड गोष्टी'कार पू. साने गुरूजी काही हिंदुत्ववादी नव्हते तर समाजवादी होते हे मात्र अनेकांच्या विस्मरणात गेलं. आजही त्यांच्या नावाने अनेकांची समाजवादी 'साधना' सुरू असते. ते एक दुसरं असो.


बाहुबलीला द्यायचाच होता तर 'लोकप्रिय' चित्रपट म्हणून पुरस्कार द्यायचा, उत्कृष्ट चित्रपट म्हणून नव्हे; असेही काहींचे म्हणणे आहे. याचा अर्थच मला कळला नाही. म्हणजे लोकप्रिय चित्रपट उत्कृष्ट नसतो किंवा उत्कृष्ट चित्रपट कधीच लोकप्रिय होऊ शकत नाही असा याचा अर्थ घ्यायचा का? उदा. एक रम्य कल्पना(च) करा, 'कोर्ट' या २०१४च्या राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा तिकीट खिडकीवर धो-धो करून वाहतोय. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव अगदी मराठी सिनेमाला हिडीस-फिडिस करणार्‍या मल्टीप्लेक्सनी सुद्धा सलमान-अक्षय कुमारचे सिनेमे उतरवून 'कोर्ट' लावलाय. कधी नव्हे ते मराठी सिनेमाची 'ब्लॅक' चालू आहे. एकपडदा सिनेगृहात लोक एकमेकांच्या उरावर चढून, पायर्‍यांत बसून, जिथे मिळेल तिथून सिनेमा बघण्यासाठी मरमर करताहेत इ.इ. तसाही (ज्यूरींच्या मते) 'कोर्ट' हा उत्कृष्ट सिनेमा आहेच. पण मग अशा रम्य 'लोकप्रिय' परिस्थितीत जर 'कोर्ट'ला उत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार जाहीर झाला असता तरीही या बुद्धिमंतांनी 'लोकप्रिय' 'उत्कृष्ट' यात भेद करत, 'कोर्ट' ला लोकप्रिय श्रेणीत हवे तर सन्मानित करा पण उत्कृष्ट नव्हे असंच म्हटलं असतं का? याबाबतचे आपले मत वाचकाने आपल्या रिस्कवर 'कोर्ट' संपूर्ण पाहून मगच घ्यावे ही नम्र सूचना. राजकीय भूमिका एक वेळ बाजूला ठेवली तरी असं निश्चितच झालं नसतं, कारण एकदा का तुम्ही स्वत:ला बुद्धिमंत म्हणवून घेतलं की लोकप्रियतेपासून दूर राहायचं असतं. जी कलाकृती जितकी जास्त दुर्बोध, जितकी अगम्य, जितकी अधिक किचकट, जितकी अधिक रटाळ, जितकी अधिक जन-अप्रिय तितकी तिची बौद्धिक उत्कृष्टता अधिक चांगल्या वाणाची अशी सर्वसाधारण समजून बुद्धिमंतांत आढळते.


महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर बाहुबलीवर आज होणारी 'संस्कृती'वादी सिनेमा ही टीका आजच निर्माण झालेली नाही तर ती गेल्या काही काळापासून साचत आलेली आहे. तिची सुरुवात झाली ती 'काकस्पर्श', 'कट्यार काळजात घुसली' , 'नटसम्राट' , 'बाजीराव मस्तानी' यासारख्या चित्रपटांच्या भव्य यशाने. किंवा अजून मागे जायचं झालं तर 'मुंबई-पुणे-मुंबई', 'दुनियादारी' इ.इ. पर्यंत जाता येईल. या सगळ्या कलाकृतीत ठळकपणे जाणवेल असे साम्य म्हणजे अभिजन(वाचा:ब्राह्मण) वातावरण. पुरोगामीपणा, सेक्यूलरिझम, समाजवाद, साम्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्यवाद आदींचा 'अंतिम पडाव' म्हणजे मनुवादाला म्हणजेच ब्राह्मणवादाला (आणि दुर्दैवाने म्हणजेच ब्राह्मणांना) विरोध हे सुज्ञ वाचक जाणतातच. त्यामुळेच वरीलप्रकारच्या कलाकृतींच्या यशाने अनेक बुद्धिमंतांच्या पोटात दुखू लागलं आहे. अधिक त्यांचा हरवलेला राजाश्रय हेही एक कारण आहे. बाहुबली हे निमित्त आहे. पण सिनेमाच्या अभिजनीकरणाचा आरोप करताना, शुद्ध व्यावसायिक हेतूने का होईना, 'फॅण्ड्री' सारख्या सिनेमाचा जोरदार प्रचार, वितरण करणार्‍या एस्सेल व्हीजन/झी टॉकीज ग्रुपमध्येही तथाकथित अभिजनांचा किंवा बहुजनांचं वर्चस्व आहे हे शोधण्यास या बुद्धिमंतांस सांगणे त्यांना सोयीचे नाही. उगाच कोणाला कशाला अडचणीत टाका?


पाकिस्तानी कलाकारांचा प्रश्न आला की कलेमध्ये भारत-पाक, धार्मिक भेदभाव करू नये असे शिकवणारे आमचे बुद्धिमंत बाहुबलीच्या आणि वर उल्लेखलेल्या इतर सिनेमांच्या निमित्ताने आपण स्वत:च कलाविष्कार व कलास्वाद या दोहोतही जातीयवादी विष घोळण्याचा प्रयत्न करत आहेत. रंगभूमी आणि साहित्याचे तर तुकडे पाडून झालेच आहेत. आता निदान सिनेमाकलेचे तरी तुकडे पाडू नका. नाहीतर तसंही ऑस्कर वाइल्डने म्हटले आहेच- ऑल आर्ट इज नॉनसेन्स.
 

No comments:

Post a Comment