Saturday, 22 August 2015

आम्ही सारे राजकारणी

महाराष्ट्र ढवळून काढणार्‍या 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कारवादावर आपली भूमिका स्पष्ट करणारे मुक्ता दाभोलकर यांचे पत्र दै.लोकसत्तात(२० ऑगस्ट२०१५) रोजी प्रसिद्ध झाले .  ते येथे वाचता येईल.

या पत्रावर प्रतिक्रिया म्हणून माझे पत्र लोकसत्तामध्ये (२१ ऑगस्ट २०१५)ला प्रसिद्ध झाले. ते येथे (पुढारी इतके भाबडे, तर चळवळ वाढेल का?) वाचता येईल.

याच पत्राचा मूळ तर्जुमा खाली देतो आहे.

***************************************************************************


आज दि. २०/०८/२०१५ रोजी 'लोकमानस' मध्ये 'महाराष्ट्रभूषण' वादाबद्दल मुक्ता दाभोलकर यांचे पत्र प्रसिद्ध झाले आहे. त्या अनुषंगाने काही बाबींची चर्चा करणे आवश्यक वाटते.
 
मुख्य मुद्दा म्हणजे " पुरस्काराचा निषेध करणाऱ्या इतरांचा बाबासाहेब पुरंदरेंच्या नावाला झालेला विरोध हा वैचारिक मतभेद या भूमिकेतून नाही तर तो जातीयवादी भूमिकेतून झालेला असेल हे आम्ही लक्षात घेतले नाही." असे  म्हणणे म्हणजे पुरस्कारावर यथेच्छ वितंडवाद  घालून आता आपले काही चालत नाही हे समजल्यावर झालेली ही उपरती नाही तर चुकीच्या लोकांच्या नादी लागल्याने आपल्या चळवळीचा जनाधार कमी होतोय की  काय या जाणीवेतून केलेलं हे डॅमेज कंट्रोल आहे. हे सामाजिक संघटनेचे लक्षण नसून कार्यभाग साधेपर्यंत वाटेल त्याच्याशी आघाडी करायची आणि एकदा कार्यभाग साधला किंवा अपयश मिळते आहे हे लक्षात आल्यावर नामानिराळे व्हावयाचे असे हे एक नवे आपछाप राजकीय फंक्शन आहे.
 
हे प्रकरण म्हणजे महाराष्ट्रातील पुरोगामी राजकारणाचे अध्वर्यू पुढारी आणि पुरोगामी कार्यकर्ते आपापल्या उद्दीष्टपूर्तीसाठी परस्परांचा कसा वापर करून घेतात याचे एक क्लासिक उदाहरण आहे. पुरोगामी कार्यकर्ते आपल्या डाव्या-समाजवादी,ंधश्रद्धा निर्मूलक, धर्मनिरपेक्ष,जातीअंत इत्यादी विचारांच्या प्रसाराला बळ मिळेल या आशेने या पुरस्कारविरोधकाचा प्रायोजक असलेल्या राजकीय पक्षामागे गेलेले नव्हते तर ते सध्या सत्तेत असलेल्या आणि आपल्या सामायिक व सनातन विरोधक  असलेल्या उजव्या हिंदुत्ववादी विचारांना झोडपण्याची एक संधी या शुद्ध राजकीय हेतूने गेले होते. असे नसते तर जे लोक सार्वजनिक गणेशोत्सवातल्या कुप्रवृत्तींविरोधात  (योग्य अशीच) जनजागृती करतात ते तशाच अजून एका सार्वजनिक उपद्रवकारी दहिहांडी नामक उत्सवाचा आश्रयदाता असणार्‍या आणि या पुरस्कारविरोधाचे नेतृत्व करणार्‍याला या उत्सवी उपद्रवाबद्दल कधी जाब विचारताना दिसत नाहीत. तसेच या पुरस्काराविरोधात असणार्‍या संघटनांचा गेली काही वर्षे चालू असलेला विखारी जातीय प्रचार महाराष्ट्रातील जागरूक पुरोगामी विचारवंतांना लोकसत्ताने  अग्रलेख लिहेपर्यंत किंवा  राज ठाकरेंनी थेट बोलण्यापर्यंत अवगत नसावा हे काही पटण्यासारखे नाही. इतके भाबडे पुढारी असतील तर पुरोगामी चळवळीच्या भवितव्याबद्दल चिंता करावी अशी परिस्थिती आहे.
 
उजवे हिंदुत्ववादी राजकारणी लोक जेव्हा समाजाच्या वेगवेगळ्या प्रवाहात आपल्याला पोषक विचारसारणीचा प्रसार करतात, निरनिराळ्या प्रतीकांचा आधार घेतात तेव्हा त्याला आपण संधिसाधू’,’फॅसिस्ट राजकारण म्हणतो त्याच प्रकारे ही पुरोगामी मंडळीही त्याच प्रकारचे संधिसाधू राजकारणच करत असतात हेच मुक्ता दाभोलकरांच्या वरील पत्रातून स्पष्ट होते. याचे कारण म्हणजे शिवाजीराजांना धर्मनिरपेक्ष ठरवण्याचा त्यांचा हास्यास्पद दावा.
 
 ज्याप्रमाणे संघ परिवारावर स्वत:चे हिरो नसल्यामुळे सरदार पटेल, नेताजी बोस, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर आदींचा वारसा पळवण्याचा आरोप होतो त्याचप्रमाणे पुरोगामी चळवळीचेही होऊ घातले आहे की काय अशी शंका येते. शाहू-फुले-आंबेडकर आदी युगप्रवर्तक विचारवंतांना  त्यांच्याच  अनुयायांनी आणि पुरोगामी राजकारण्यांनी जातींच्या क्षुद्र बंधनात अडकवल्यामुळे त्यांचे अपील मर्यादित झाले आहे याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे आता मास अपील असलेल्या शिवाजीराजांना आपल्या धर्मनिरपेक्ष कळपात ओढण्याचे आणि त्यानिमित्ताने हिंदुत्ववादी राजकारण्यांच्या हातून एक हुकमी मुद्दा काढून घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे हेही संधिसाधू राजकारणच आहे. पण हे राजकारण हे जास्त सिलेक्टीव प्रकारचे असल्यामुळे या प्रकरणात झाला त्याप्रमाणे पुरोगामी चळवळीचा वारंवार मुखभंग होतो. त्यामुळे पुरोगामी विचारवंतांनी  या पुरस्कारवादातील आणि एरवीही असलेल्या आपल्या भूमिकेला उगाच सामाजिकतेचा , वैचारिकतेचा मुलामा देण्याची गरज नाही. आम्ही सारे राजकारणी असे त्यांनी आता खुल्या दिलाने मान्य करावे. त्यात वावगे वा कमीपणा वाटण्याचे काहीच कारण नाही. कारण कुठलीही चळवळ ही शेवटी राजकीयच असते, भलेही प्रत्यक्ष सत्ताप्राप्ती हे तिचे अंतिम ध्येय असो वा नसो. 
 

No comments:

Post a Comment