Monday, 4 August 2014

“जिंदगीभर नही भुलेगी वो बरसात की रात !”
"जिंदगीभर नही भुलेगी वो...........
             ..............बरसात की रात !"
 
नवीनच नोकरी होती. रुजू होऊन काही महिनेच झालेले. तेवढ्यात बदली झाली. म्हणजे आमचं ऑफिसच शिफ्ट झालं. एका धरणावरून दुस‍‍र्‍या धरणावर. आता कोणी राहत नसलेल्या भकास, अंधार्‍या चाळवजा जुनाट क्वार्टर्समध्ये आम्ही आमचं  तात्पुरतं ऑफिस उभारलं. सोबतीला आजूबाजूला फक्त जंगल,  धरणाचं पाणी आणि सोबतीला असंख्य सरपटणारे जीव. इंजिनीयरचं लाइफ म्हणजे काय असतं त्याचा अनुभव सुरू झाला.
 त्या ठिकाणी खूप पाऊस पडतो असं ऐकून होतो.  वर्षाला कमीत कमी १५०० मिमि. ठरलेलाच म्हणे.  पण आभाळातून बरसणारं पाणी जरी सगळीकडे तेच असलं तरी त्याचं रूप प्रत्येक ठिकाणी प्रत्येकवेळी वेगळं असतं. कुठल्याही संगीताप्रमाणेच पाऊस ही देखील एक अनुभवण्याचीच गोष्ट आहे. या पृथ्वीवर पहिला पाऊस पडल्यानंतर कैक वर्षांनी माणसाच्या तोंडी फुटलेले फुटकळ शब्द या प्राचीन पावसाला कसं कवेत घेणार ?
त्या नदीच्या शुद्ध, नितळ पाण्याकडे बघतच राहावं असे वाटे. माझ्या शहरी मनाला त्याचं कोण अप्रूप.  म्हणून धरणाच्या कडेलगतचं क्वार्टर मी घेतलं. आमच्या ऑफिसपासून आणि  बाकी सहकार्‍यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून काहीसं दूर,  एकाट.  आजूबाजूला शेजार म्ह्णूनही कोणी नाही. पॉवरहाऊसची बांधणी करायला आलेल्या परदेशी तंत्रज्ञांसाठी इतरांपासून जरा वेगळीच बांधलेली ती चाळ. घरी आलं की खिडकी उघडावी अन् पाण्याकडे बघत बसावं, मन भरेपर्यंत. तिथे एकटं राहण्याबाबत मला माझ्या साहेबांनी सावध केलेलं , पण आम्ही कधी ऐकलंय कोणाचं ?
असाच जुलैचा महिना होता तो.  त्या दिवशीही अशीच पावसाची झडी लागली होती. साहेब दुपारीच कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. कसलीतरी सुट्टी असल्याने मी सोडून ड्युटीवर कोणी नव्हतं. दुपारच्या चहाची वेळ झाली तेव्हा पाऊसही जणू 'टी ब्रेक' घ्यायला थोडा थांबलेला. पण अंधारून आलं होतं. ही पुढ्च्या इनिंगची सुरूवात होती, मला माहिती होतं. मी ऑफिसची कुलूपं लावत आणि छत्री सांभाळत रेस्टहाऊसमध्ये पोचेस्तोवर पुन्हा विजांचा एक कडाका झाला आणि आभाळाचं दार उघडलं. तिथला पाऊस बदाबदा पडणारा , आक्रस्ताळा नसतो तर शांत संयमी पण भरपूर पडतो.  दोन वेळा वाफाळता चहा घेऊन संपला ,खानसाम्यासोबतच्या गप्पा संपल्या पण पाऊस थांबत नव्हता.  शेवटी रात्रीच्या जेवणाची वेळ आली तरी पाणी मला बाहेर पडू देईना. तोवर साहेबसुद्धा रात्री मुक्कामी येणार नसल्याचा टेलिफोन आला. अखेर  तेथेच गरमागरम  जेवणावर ताव मारल्यावर मी खानासाम्याला म्हणालो," आप्पा, कंटाळा आला आता इथे बसून , जातो आता क्वार्टरवर !"
"इतक्या पावसाचं कुठे जाताय साहेब,आज र्‍हावा की इथंच !" परंतु खानसाम्याच्या त्या सल्ल्याला न जुमानता मी  आपली मिणमिणती बॅटरी पेटवून निघालो. रानात राहणार्‍याची बॅटरी ही खरी सोबतीण.
 खरं म्हणजे ते ठिकाण म्हणजे कोकणाची सुरूवातच. कितीही पाऊस पडला तरी तेथे फारसा चिखल होत नाही. झपाझप चालता येतं. कोकणासारखी तांबडी माती, अजिबात पाणी धरून ठेवत नाही. तिथल्या इतक्या पाण्यापावसात शिवाजीराजांनी कसं काय राज्य केलं आणि कशा काय लढाया जिंकल्या, तेही साडेतीनशे वर्षांपूर्वी;  याचं मला नेहमीच नवलं वाटतं. या विचारातच मी   अंधारातच क्वार्टरच्या पायर्‍या चढलो आणि दार उघडलं. जरा आवरून अंग टाकलं.
बाहेर पावसाची कालपासून सुरू असलेली संततधार सुरूच होती.  संततधार या शब्दाचा खरा अर्थ मला पहिल्यांदा समजत होता.  पाऊस जरी बाहेर सुरू असला तरी त्याचं अस्तित्व मात्र सगळीकडे जाणवत होतं. त्याचं राज्य हळुहळू सुरू झालं होतं. भिंती,फर्निचर, कपडे, अन्न, कागदं आणि अर्थातच हवा यात एकप्रकारचं भारलेपण, ओलेपण आलं होतं. कुठल्या तरी पर्वताच्या कडेकपारीत असलेल्या सदा  सर्दावलेल्या गुहेत राहिल्यासारखं. वस्तूंना प्रत्यक्ष स्पर्श न करताही त्या पावसाच्या नशेच्या अंमलाखाली आहेत हे जाणवू लागलं.  छत म्हणून टाकलेल्या पत्र्यावर  होणारा आवाज. आवाज नव्हे, पावसाचा श्वासोच्छ्वासच . एका तालात, एका लयीत ,धीर गंभीर .  एखादा साधू वेदोक्त मंत्र म्हणत असल्यासारखा.
मी आपल्या 'फिलिप्स' रेडिओचा अ‍ॅंटेना बाहेर ओढला. 'छायागीत' सुरू होतं. युनूस खानचा चिरपरिचित सादगीपूर्ण आवाज आसमंतात घुमला. पुढचं गाणं सुरू झालं. "जिंदगीभर नही भुलेगी वो बरसात की रात..."  रफीचा स्वर्गीय आवाज आणि रोशनची अनवट सुरावट. पण माझ्या डोळ्यासमोर आला तो भारतभूषणचा  बेंगरूळ चेहरा अन् मला हसू फुटलं. वाटलं हे कुणाशी तरी 'शेअर' करावं, उत्तमोत्तम गाण्यांचा पडद्यावर  सादरीकरणात कसा कचरा झाला या आपल्या आवडत्या विषयावर कुणाशीतरी गप्पा माराव्यात. पण मग अचानक लक्षात आलं , आपल्या आजूबाजूला कुणीच नाहीए. दुसरा जिवंत माणूस आपल्याभोवताल किमान पाच किलोमीटरच्या परिघाच्या बाहेर असला तर असेल. आता इथे, या क्षणी आपण पूर्णपणे  एकटे  आहोत , एकटे !
तेवढ्यात वीज गेली. मिट्ट काळोख झाला न् माझ्या पोटात खड्डा पडला.
बाहेर  एकदम विजा कडाडणं सुरू झाल्या. जबरद्स्त वारा सुटल्याचा आवाज येऊ लागला. धरणाच्या संथ पाण्याचे पापुद्रे उडवत वाहणारा वारा झाडांच्या फांद्यांमधून खिडक्या-दारांच्या चिंचोळ्या फटीतून बेधडक आत घुसत होता. आतापर्यंत संथ बरसणारा पाऊस आता आडवातिडवा आणि  अधिक त्वेषाने पडू लागला. पाण्याचे टपोरे थेंब पत्र्याला झोडपून काढत होते.   पावसाचा आवाज अनियमित झाल्याबरोबर छतामधे खाचाखोचांत लपून बसलेले उंदीर –घुशी धावपळ करू लागले. छत आता केव्हाही गळू लागेल , मला वाटलं.  अंगणातलं म्हातारं झाड छतावर कोसळलं नाही म्हणजे मिळवलं. मी अंधारातच  उठलो. बॅटरी सांभाळत खिडकीपाशी गेलो, ती किंचितशी उघडली. वार्‍याचा  जोर इतका  होता की तिला एका ठिकाणी रोखून ठेवणंही कठीण होतं. इतका काळोख मी कधीच पाहिला नव्हता. कधी अनुभवला नव्हता. डोळ्यांत बोटं घालूनही कधी दिसत नाही म्हणतात तसं. दार उघडून बाहेर जाऊन बघण्याची अनावर इच्छा झाली. पण दार उघडून एकदा का बाहेर गेलो की पाऊससापळ्यात अडकलो, असं दुसरं मन सांगू लागलं. मी दुसर्‍याचं ऐकलं. तरीदेखील मला कशाची तरी भिती वाटू लागली. पण कशाची ? पावसाची? अंधाराची? की एकटेपणाची ? वाटलं, हे त्याचं राज्य आहे; पावसाचं. इथे आपलं काही  चालायचं नाही. मुकाट त्याचा खेळ पाहायचा. अंधारात नाही दिसला तर नुसता ऐकायचा. ऐकू  नाही  आला तर नुसता जाणीवांनी अनुभवायचा. या चार भिंतीआड आपण सुरक्षित आहोत असा  समज करून घ्यायच्या; जोवर काही  होत नाही तोवर ; डोळे मिटून दूध पिणारं मांजर जेवढं स्वत:ला काठीच्या  मारापासून सुरक्षित समजतं तसं. 
मी खिडकी पक्की लावून घेतली , परतलो आणि माझा पलंग खोलीच्या मध्यभागी आणला.  पाय पोटाशी घेऊन बसून राहिलो. न जाणो किती वेळ; एखाद्या भिजलेल्या मांजरासारखं.
ठरल्याप्रमाणे दिवस उजाडला. लख्ख ऊन पडलं. जणू  काल रात्री काही घडलंच नव्हतं.
मी ऑफिसमध्ये आलो. बॉसच्या टेबलावर दोन अर्ज टाकले.
एक क्वार्टर बदलून मिळायचा आणि दुसरा त्या ठिकाणाहून बदली मिळण्याचा.


3 comments:

Swapnil said...

अभिशेक.. खूप छान

Vijay Shendge said...

खूप छान लिहिताय. लिहिता हात थांबू देऊ नका.

Arun Joshi said...

Very nice experience.

Post a Comment