Thursday, 27 February 2014

एका विचारवंताचा मृत्यू

एका विचारवंताचा मृत्यूदुपारी साडेबारा- पाऊणची वेळ. डॉ. जोशी आपल्या क्लिनिकमध्ये (नेहमीप्रमाणे) एकटेच बसले होते. दोन- चार दिवसांत तर एखादा एम.आर. सुद्धा फिरकला नव्हता. त्यामुळे वाचायलासुद्धा काही नवे रंगीबेरंगी कागद नव्हते. शेवटी आपल्याच, दिनांकाच्या ठिकाणी ‌‌‌‌‌----/----/१९९--  असे छापलेल्या, जुनाट- पिवळट पण चालू प्रिस्क्रिप्शन पॅडवर रेघोट्या ओढत बसले होते. तेवढ्यात त्यांना दरवाजापाशी कोणीतरी चपला काढत असल्याचा आवाज आला. त्यांनी उत्साहाने मान वर केली.

दरवाजात एक दुसरे डॉक्टर, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, डॉ. संवत्सरकर उभे होते. वर हिरवा कुडता आणि खाली निळी जीन्स, कुडत्यावर जॅकेट, थोडीशी फ्रेंचकट दाढी, डोळ्यांवरचा गोल चष्मा आणि त्याची लोंबकळणारी लेस सांभाळणार्‍या संवत्सरकरांचा चेहरा मलूल दिसत होता. त्यांना पाह्ताच डॉ. जोशी म्हणाले-
“ या...या...विचारवंत, प्रज्ञावंत या. काय कुठे भाषण देऊन येत आहात की भाषण दयायला जात आहात ?”

“ तेवढं सोडून बोला...” संवत्सरकर दारातून माघारी वळू लागले. 

“ अहो, थांबा..थांबा अन् तुमचा चेहरा असा पडसं झाल्यासारखा का दिसतोय ?”

संवत्सरकर थांबले. आत आले आणि डॉ.जोशींच्या पुढ्यातल्या खुर्चीत मटकन् बसले. 

“ काय सांगू डॉक्टर तुम्हाला ?”

“ का काय होतंय ? बद्धकोष्ठ बळावलंय का ?”

“ नव्हे,  तसं काही नाही. गेले काही दिवस जरा वेगळाच त्रास होतोय” संवत्सरकरांनी ‘पॉझ’ घेतला “ वांत्या यायच्या थांबल्यात..”

“ काय म्हणालात ? कालच तुमचा चिरंजीव मंडईत भेटला. नवीन सूनबाईंना कोरड्या उलट्या होत आहेत म्हणून तिला घेऊन माझ्याकडे येतो म्हणाला. मीच त्याला म्हणालो, काळजीचं कारण नाही. माझ्या मुलीचाच रेफरन्स त्याला दिला. गायनॅक आहे ना ती ‘पार्श्वनाथ’ हॉस्पिटलला.”

“ ते नाही हो. प्रॉब्लेम माझाच आहे. मलाच वांत्या यायच्या थांबल्यात. विचारांच्या वांत्या.” संवत्सरकर त्रस्त आवाजात म्हणाले. 

“म्हणजे? हे काय नवंच ?” 

“होय. विचारवंताला विचारांच्या वांत्या न येऊन कसं चालेल ? परवापर्यंत कसं सगळं सुरळीत सुरू होतं. रोजची वृत्तपत्रं वाचली- टी.व्ही.वरच्या त्याच त्या बातम्या ऐकल्या- सोसायटीतल्या ज्येष्ठ नागरिकांच्या कंपूत चालणार्‍या कुटाळक्या ऐकल्या, अधनं मधनं विद्रोही-समाजवादी-पुराणमतवादी सभा-संमेलनाला हजेरी लावली की कसं पित्त खवळून यायचं. मळमळायला लागायचं. मेंदूतच नव्हे तर शरीराच्या रंध्रारंध्रात विचारांचा काढा साकळून यायचा. वाटायचं, हा रस कधी एकदाचा बाहेर टाकून मोकळं होतोय ! मग वाचकांचा पत्रव्यवहार, कधी-मधी एखादा छोटेखानी लेख, शारदीय-वासंतिक व्याखानमाला, ते नसल्यास ज्येष्ठ नागरिक संघांची फुटकळ संमेलनं, याची साठी – त्याची पंच्याहत्तरी असले कार्यक्रम आणि जमलंच तर टी.व्ही.च्या ‘आजचा-उद्याचा-रोजचाच सवाल’ मधल्या खिडक्या; कुठेही मी आपल्या विचारांची वांती ओकत असे. मला कुठलाही विषय वर्ज्य नव्हता, कुठलाही. स्त्री-भ्रूण हत्या असो वा खेळांतलं डोपिंग असो, साधू-बाबंचे अय्याशी चाळे, जमिनीखालचं-झाडावरचं- पाण्यातलं सोनं असो, रात्रीच फिरणारे मंकीमॅन, महापुरूषांची स्मारकं वा शीतपेयांतली कीटकनाशकं असो; माझा सर्वत्र संचार होता...”

“ मग आता काय होतंय ?”, डॉ. जोशींना आपला दिवस सार्थकी लागणार असं वाटू लागलं. त्यांनी डॉक्टरी लाघवीपणाने आपल्यासमोरच्या ‘केस’कडे पाहिलं.

“ आता तर फार भयंकर प्रकार घडलाय. कितीही वाचलं, कितीही चर्चा- परिसंवाद ऐकले तरी विचारांच्या वांत्याच यायच्या थांबल्यात. या ‘पुण्यनगरी’तले सांस्कृतिक कार्यक्रम आमच्यासाठी जणू बंदच झाले आहेत. आयोजक आता आमच्यासारख्या,छे, म्हणायलासुद्धा लाज वाटते- आमच्यासारख्या विचारवंतांना-  विचारेनासे झालेत. हे असले वैचारिक समारंभी कपडे घालून विचारवंताचा ‘परकायाप्रवेश’ का म्हणतात तो तरी जमतोय का ते बघतोय.  पण वैचारिक ताप काही चढत नाहीये, डॉक्टर....!”

“ मला तर वेगळंच काही चढल्यासारखं वाटतंय. काय हल्ली फ्रिक्वेंसी वाढलीय का ब्रॅण्ड बदललाय ?”, डॉ. जोशींनी ‘एकलव्यी’ अंगुलिनिर्देश करत मिष्कीलपणे विचारलं.

“ चेष्टा करताय राव ! मी खरंच सांगतोय आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे  या रोगाची साथ फार झपाट्यानं पसरतेय, डॉक्टरसाहेब...”

“ अस्सं..?”

“तर काय ! आमच्या आजूबाजूच्या सोसायटीत माझ्यासारखेच तीन-चार विचारवंत आहेत. त्यातल्या एक-दोघांना मी कालच ‘बालगंधर्व’जवळ,  आपल्या वैचारिक उर्मीचा निचरा करण्याच्या शोधात असणार्‍या हावर्‍या कुत्र्यासारखं ‘रसिकां’भोवती घुटमळतांना पाहिलंय.  पण रसिक-अभिजन-सुज्ञ-सुजाण नागरिक मात्र त्यांना ‘स्वाईन-फ्ल्यू’च्या पेशंटला टाळावं तसं टाळत होते. भयंकर ‍! फारच भयंकर !”

“ पण तुम्ही काय करत होता तिथं ?”

“ ते जाऊ द्याहो !”, संवत्सरकर खेकसले, पण लगेच नरमले.  “खरं म्हणजे, मी तिथे चालू असलेल्या ‘गोल्डन लीफ सोशल फाऊंडेशन’ च्या ‘त्रयोदशरत्न’ पुरस्कार सोहळ्यात आपल्यालाही एखादं एक्स्ट्रा झालेलं चौदावं रत्न मिळतंय का या खटपटीत होतो.” संवत्सरकरांनी डॉ. जोशींच्या मागे टांगलेल्या येशू ख्रिस्तासारखे दोन्ही हात पसरलेल्या , पुरातन ‘ह्युमन अ‍ॅनॉटॉमी’च्या मॉडेलकडे पाहत ‘कन्फेशन’ दिलं.

“ हं...धिस इज रिअली अ सिरिअस प्रॉब्लेम. डोंट वरी. वी विल डू समथिंग अबाऊट इट. पण असं का झालं असावं असं वाटतंय तुम्हाला ? तुमचा कुणावर संशय ?” , डॉ.जोशींवर फावल्या वेळेतल्या ‘सी.आय.डी.’ अ‍ॅडिक्शनचे  सिम्पट्म दिसू लागले होते.

“ हे...हे सगळं त्या नाटककारामुळे झालंय. काय बरं नाव आहे त्या नागपूरच्या नाटककारांचं...लाभसेट्टीवार ...कोंडबत्तुनवार...नाही नाही एलकुंचवार...हं...एलकुंचवारच. त्यांनी स्वत:च्या पंच्याहत्तरीला भली मोठी मुलाखत दिली अन् म्हणे मला विचारवंतांची भीती वाटते. महाराष्ट्रात विचारवंत फार बोकाळले. माय फूट ! भरीस भर म्हणून त्या टिकेकरांनीही नागपुरात जाऊन त्यांचीच ‘री’ ओढली.

तेव्हापासनचं होतंय हे सगळं ! रात्ररात्र  डोळ्याला डोळा लागत नाही. विचार थांबलेत. वांत्या थांबल्या. माझ्यातल्या विचारवंताचा मृत्यू झालाय डॉक्टरसाहेब. प्लीज हेल्प मी !”,  संवत्सरकर काकुळतीला आले होते.

“अहो एकदा मृत्यू झाला म्हटल्यावर डॉक्टर तरी काय करणार ? चला क्लिनिक बंद करायची वेळ झाली.”

“अहो डॉक्टर माझा थोडा तरी विचार करा..”

“संवत्सरकर. एक वाजला दुपारचा. शिस्तबद्ध जीवन आहे इथलं. जा..तुम्ही आता घरी जा..आराम करा.”  डॉ.जोशी सराईतपणे उठले. 

डॉ. संवत्सरकरांनी हताशपणे टेबलावर मान टाकली. न जाणो कुठल्या विचारात ते गढून गेले होते.

No comments:

Post a Comment