Sunday, 9 June 2013

IPL- एका खेळाचा खेळखंडोबा...

 
IPL- एका खेळाचा खेळखंडोबा...
IPL संपलं तरी अजून कवित्व चालूच आहे म्हणून क्रिकेटमधील Fixing या
राष्ट्रिय अरिष्टा बद्द्ल आपणही आपले मत व्यक्त करावे असे वाटले. त्यासाठी
काही वृत्तवाहिन्यांना , एखादी 'खिडकी' भाड्याने मिळेल का याची पण चौकशी
केली. पण या 'मान्यवर' खिडकीत बसण्यासाठी किमान पात्रता ही " किमान एकदा
तरी BCCIने घातलेली आजीवन बंदी" असल्याने आणि स्टुडिओतील चर्चेसाठी
(तंबूतील सिनेमाप्रमाणे) स्वत:चा एक 'उंच असा स्टूल' आणणे आणि त्यावर पाय
लट्कत ठेवून चर्चा करण्याची सवय असणे या पूर्व-अटी असल्याने शेवटी जालावरील चर्चेनेच आमची चर्चेची खुमखुमी भागवावी लागते आहे.
तर क्रिकेट हा प्रामुख्याने पेशन्सचा खेळ आहे. कसोटी क्रिकेटचे
दिवस ६-५-४-३ असे काळाबरोबर घसरले आणि एक दिवसीय क्रिकेट ६० षटकांवरून ५०
वर आले तरी खेळाचा मूळ स्वभाव बदद्ला नव्हता. परंतु २०-२० (वाचा IPL)
मध्ये या मूळ स्वभावालाच उखडून टाकण्यात आले. IPL हे Fixing करण्यासाठी , पैसा कमविण्यासाठीच तयार करण्यात आलं हे अगदी पहिल्या दिवसापासून तमाम
क्रिकेट प्रेमींना माहित आहे. अन ही इतकी साधी गोष्ट आपल्या
प्रसारमाध्यमांना कशी कळत नाही हेच समजत नाही. ते उगाचच श्रीनिवासन यांच्या मागे लागलेत. मुळात IPL हा खेळच नाही, एक sport म्हणून त्यात एकही लक्षण
नाही. हे आपल्या सरकारलाही चांगलं माहीत आहे म्हणून गरज वाटली तेव्हा IPL
ला देशाबाहेर हाकलण्यात तेव्हाच्या आमच्या गृहमंत्र्यांनी काहीही विलंब
लावला नाही. आणि विशेष म्हणजे IPL आयोजकांनीही IPL द. आफ्रिकेत नेण्यात
तत्परता दाखवली कारण IPL सामन्यांचे स्टेडिअम कलेक्शन हे TV हक्क आणि सट्टा यांच्या तुलनेत अगदीच खुजं आहे.
माध्यमांनीही या बाबतीत उगाच नैतिकतेचा आव आणण्याची गरज नाही.
क्रिकेटबाबत त्यांची भूमिका कायम दुटप्पीपणाचीच राहिलेली आहे. काही
दिवसांपूर्वी BCCI ला राष्ट्रीय स्पर्धा आयोगाने (CCI) ने क्रिकेट मध्ये
एकाधिकारशाही केल्याबद्द्ल ५०-५२ कोटींचा दंड ठोठावला आहे. बहुसंख्य
वृत्तपत्रांनी याची एखादी बारीकशी बातमी क्रिडा पानावर छापली आणि तर वृत्त
वाहिन्यांनी त्यांच्या Top 100 Speed News मध्ये यासंबंधी ढणढण
पार्श्वसंगीतात एक 'वाक्य' वाचून दाखवलं. परंतु तुरुंगात संजय दत्तला
पुड्या बांधण्याचे की सूतकताईचं काम मिळाले यावर चर्चेच्या पुड्या
सोड्णाऱ्यांना या महत्त्वाच्या विषयावर Talk Show करावा असं वाटलं नाही.
पण या सर्वांवर उपाय काय ? काही लोक म्हणतात की IPL बंद करा. य़ा
उपायाने नव्याच समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आज Fixing, Betting
होते म्हणून आपण IPL बंद करू , उद्या सिनेमात Underworld चा पैसा आहे
म्हणून सिनेमे काढण्यावर बंदी घालू, राजकारणात भ्रष्टाचार आहे म्हणून
राजकारण Follow करायचं सोडून देऊ ,पण मग या देशातल्या काम नसलेल्या करोडो
आणि जास्त पैसा असलेल्या लाखो बेकार बांधवांनी करायचं तरी काय ? याहीपेक्षा भीषण प्रश्न म्हणजे असं झाल्यावर मग कराचीत (का अजून कुठे) बसलेल्या त्या
महात्मा दावूदने आपल्या काळ्या चष्म्यातून टी.व्हि वर काय पहायचं आणि
मोठ्या प्रमाणावर फोफावलेल्या टि. व्ही पत्रकारांनी आपली दाढी खाजवत कुणाला आणि कशावर 'सवाल' विचारायचे ? म्हणून IPL बंद पडू नये या व्यापक
जनहिताच्या कारणास्तव आणि संबंधितांचे या वर्षी झालेले नुकसान भरून
काढण्यासाठी ' राष्ट्रीय आपत्ती राहत कोषा'तून मद्त जारी करण्याची आम्ही
मागणी करणार आहोत. कारण काही झालं तरी खेळ जगलाच पाहिजे...खेळ जगलाच
पाहिजे.

No comments:

Post a Comment