Sunday, 9 June 2013

IPL- एका खेळाचा खेळखंडोबा...

 
IPL- एका खेळाचा खेळखंडोबा...
IPL संपलं तरी अजून कवित्व चालूच आहे म्हणून क्रिकेटमधील Fixing या
राष्ट्रिय अरिष्टा बद्द्ल आपणही आपले मत व्यक्त करावे असे वाटले. त्यासाठी
काही वृत्तवाहिन्यांना , एखादी 'खिडकी' भाड्याने मिळेल का याची पण चौकशी
केली. पण या 'मान्यवर' खिडकीत बसण्यासाठी किमान पात्रता ही " किमान एकदा
तरी BCCIने घातलेली आजीवन बंदी" असल्याने आणि स्टुडिओतील चर्चेसाठी
(तंबूतील सिनेमाप्रमाणे) स्वत:चा एक 'उंच असा स्टूल' आणणे आणि त्यावर पाय
लट्कत ठेवून चर्चा करण्याची सवय असणे या पूर्व-अटी असल्याने शेवटी जालावरील चर्चेनेच आमची चर्चेची खुमखुमी भागवावी लागते आहे.
तर क्रिकेट हा प्रामुख्याने पेशन्सचा खेळ आहे. कसोटी क्रिकेटचे
दिवस ६-५-४-३ असे काळाबरोबर घसरले आणि एक दिवसीय क्रिकेट ६० षटकांवरून ५०
वर आले तरी खेळाचा मूळ स्वभाव बदद्ला नव्हता. परंतु २०-२० (वाचा IPL)
मध्ये या मूळ स्वभावालाच उखडून टाकण्यात आले. IPL हे Fixing करण्यासाठी , पैसा कमविण्यासाठीच तयार करण्यात आलं हे अगदी पहिल्या दिवसापासून तमाम
क्रिकेट प्रेमींना माहित आहे. अन ही इतकी साधी गोष्ट आपल्या
प्रसारमाध्यमांना कशी कळत नाही हेच समजत नाही. ते उगाचच श्रीनिवासन यांच्या मागे लागलेत. मुळात IPL हा खेळच नाही, एक sport म्हणून त्यात एकही लक्षण
नाही. हे आपल्या सरकारलाही चांगलं माहीत आहे म्हणून गरज वाटली तेव्हा IPL
ला देशाबाहेर हाकलण्यात तेव्हाच्या आमच्या गृहमंत्र्यांनी काहीही विलंब
लावला नाही. आणि विशेष म्हणजे IPL आयोजकांनीही IPL द. आफ्रिकेत नेण्यात
तत्परता दाखवली कारण IPL सामन्यांचे स्टेडिअम कलेक्शन हे TV हक्क आणि सट्टा यांच्या तुलनेत अगदीच खुजं आहे.
माध्यमांनीही या बाबतीत उगाच नैतिकतेचा आव आणण्याची गरज नाही.
क्रिकेटबाबत त्यांची भूमिका कायम दुटप्पीपणाचीच राहिलेली आहे. काही
दिवसांपूर्वी BCCI ला राष्ट्रीय स्पर्धा आयोगाने (CCI) ने क्रिकेट मध्ये
एकाधिकारशाही केल्याबद्द्ल ५०-५२ कोटींचा दंड ठोठावला आहे. बहुसंख्य
वृत्तपत्रांनी याची एखादी बारीकशी बातमी क्रिडा पानावर छापली आणि तर वृत्त
वाहिन्यांनी त्यांच्या Top 100 Speed News मध्ये यासंबंधी ढणढण
पार्श्वसंगीतात एक 'वाक्य' वाचून दाखवलं. परंतु तुरुंगात संजय दत्तला
पुड्या बांधण्याचे की सूतकताईचं काम मिळाले यावर चर्चेच्या पुड्या
सोड्णाऱ्यांना या महत्त्वाच्या विषयावर Talk Show करावा असं वाटलं नाही.
पण या सर्वांवर उपाय काय ? काही लोक म्हणतात की IPL बंद करा. य़ा
उपायाने नव्याच समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आज Fixing, Betting
होते म्हणून आपण IPL बंद करू , उद्या सिनेमात Underworld चा पैसा आहे
म्हणून सिनेमे काढण्यावर बंदी घालू, राजकारणात भ्रष्टाचार आहे म्हणून
राजकारण Follow करायचं सोडून देऊ ,पण मग या देशातल्या काम नसलेल्या करोडो
आणि जास्त पैसा असलेल्या लाखो बेकार बांधवांनी करायचं तरी काय ? याहीपेक्षा भीषण प्रश्न म्हणजे असं झाल्यावर मग कराचीत (का अजून कुठे) बसलेल्या त्या
महात्मा दावूदने आपल्या काळ्या चष्म्यातून टी.व्हि वर काय पहायचं आणि
मोठ्या प्रमाणावर फोफावलेल्या टि. व्ही पत्रकारांनी आपली दाढी खाजवत कुणाला आणि कशावर 'सवाल' विचारायचे ? म्हणून IPL बंद पडू नये या व्यापक
जनहिताच्या कारणास्तव आणि संबंधितांचे या वर्षी झालेले नुकसान भरून
काढण्यासाठी ' राष्ट्रीय आपत्ती राहत कोषा'तून मद्त जारी करण्याची आम्ही
मागणी करणार आहोत. कारण काही झालं तरी खेळ जगलाच पाहिजे...खेळ जगलाच
पाहिजे.

Saturday, 9 March 2013

मार्जार पुराण

मार्जार पुराण

 
माझ्या जीवनात आलेल्या मांजरी ( कृपया "मांजरी " या शब्दाच्या जागी ' स्त्रिया' हा शब्द टाकून चाल बदलू नये ) हा स्वतंत्र लेखाचा विषय असू शकतो असं  मला कधीच वाटलं  नव्हतं . पण तसा प्रसंग माझ्या प्राणि जीवनात नुकताच घडला .

तसं  माझं  प्राणि जीवन फारसं  'समृध्द ' का म्हणतात तस  नाही .  मी एका लहान शहरात जन्मलो , शहराबरोबरच चारी बाजूनी नसलो तरी काही आघाड्यांवर वाढलो . मग  अजून मोठ्या शहरात उद्याच्या दाण्यागोट्याची व्यवस्था करायला गेलो. त्यामुळे एखाद्या निम-खेडवळ  शहरात असतात तसले प्राणीच मला बघायला मिळाले . त्यातले प्रमुख म्हणजे शेळपटलेल्या गायी, नुकत्याच निसर्गोपचार केंद्रातून आल्यासारख्या वाटण्याऱ्या  चिखलमय म्हशी , भर रस्त्यात मान खाली घालून चिंतन  करणारी गाढवं , रिकामटेकडे  ( 'कुत्रे ' लिहिण्याची गरज नाही कारण 'टेकडा ' म्हणजे हिंदीतला कुत्रा असं  मी नुकतंच  वाचलंय ), संसदेत क्वचितच दिसणाऱ्या  सेलिब्रेटी टर्नड  खासदारांसारखी  ऐटीत  चालणारी डुकरं  इत्यादी इत्यादी … पण  मांजरीसारखं  मला आजवर कुणी भारावून टाकलं  नाही . 

मांजर हे एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे. हो, व्यक्तिमत्वच ! त्याच्या खासगी जीवनाबद्दल मला फारशी माहिती नसली  तरी त्याच सार्वजनिक जीवन मात्र फारच वैशिष्ट्यपूर्ण  आहे . 

कपड्यांच्या मोठमोठ्या दुकानात असणाऱ्या काळ्या कुळकुळीत निर्जीव मॉडेल्ससारखा कमनीय बांधा , लो. टिळकांनाही हेवा वाटेल अशा झुबकेदार मिशा, रडारच्या अण्टेनासारखी सतत कसलातरी वेध घेणारी शेपटी , ज्यावरून ramp वरच्या मोडेल्सच्या चालक्रिडेला नाव पडले ती जगप्रसिद्ध चाल आणि सरतेशेवटी हरीण , मासे  असल्या सुनेत्री प्रतिस्पर्ध्यांच्या तोंडात मारणारी भेदक , खिळवून ठेवणारी नजर !

' जादू तेरी नजर' मुळात एखादया  मांजराला उद्देशूनच लिहिलेलं गाणं  असावं किंवा 'तौबा ये मतवाली चाल'  मध्ये वहिदा रहेमानच्या जागी एखादी मांजर नक्कीच जास्त शोभून दिसली असती . 

मांजरीच्या डोळ्याला डोळा भिडवण्याचा अयशस्वी प्रयत्न मी नेहमीच करत आलोय . पण जिथे साधा फोटो काढतानासुद्धा मी पापणी न लवता  राहू शकत नाही तिथे मांजरासारख्या नेत्रशूरापुढे माझा काय टिकाव लागणार ? मांजरीचे ती खुनशी नजर अन त्यातले मला ' खाऊ की गिळू ?' असे म्हणणारे भाव या सामन्याचा निकाल काही सेकंदातच लावून मोकळे होतात. एकजात सर्व मांजरी हा आपला 'कुलदुष्मन ' आला अशी ट्रिटमेण्ट  मला का देतात हे त्यांच्या डोळ्यांइतकंच गहिरं कोडं  आहे. कदाचित माझं  आडनाव त्यांना माझ्या चेहऱ्याकडे पाहून कळत  असावं म्हणून . कारण दारावरची नावाची पाटी  वाचून येणारं सभ्य आणि सुशिक्षित मांजर मला तरी अजून भेटले नाही . 

पण त्यामुळे हे शीतयुद्ध नेहमी एकतर्फीच होते असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे . मांजरावर कुरघोडी करायच्या अनेक युक्त्या माझ्याकडेही आहेत . उदा .  मांजर आडवे जात असताना हॉर्न वाजवून किंवा सरळ त्याच्या अंगावर गाडी नेऊन मग स्वतःच आडवे जाणे , काळी   मांजर असेल तर एडिश्नल Talktime घेऊन दोन वेळा  जास्त  'शुक शुक ' करून तिला हुसकावणे ,मांजराला उंदीर मिळू नयेत म्हणून स्पेशल भजे तळून पिंजऱ्यात  ठेवणे आणि पकडलेले उंदीर सातासमुद्रापार सोडून येणे इत्यादी इत्यादी .  कुत्र्याच्या भुंकण्याची  परफेक्ट नक्कल करून मांजरांना घाबरवणे हा एकेकाळी माझा आवडता पासटाइम होता . यात मांजरं  जास्त घाबरत कारण त्यांना फक्त कुत्र्याचा आवाज येई पण कुत्रं  मात्र कुठे दिसत नसे  आणि त्या मला बोचकारायला येण्याचा काही धोका नव्हता कारण मांजर अंगणात तर मी दुसऱ्या  मजल्यावरच्या बाल्कनीत असा तो 'सेफ गेम' असे.

पण मांजराला पूर्ण  चेकमेट करणे मला अजून तरी जमलेले नाहीये . कारण मांजरं  असतातच तशी चालू . ते तर आद्द्य  घरफोडे आहेत . हळूच जातील, हळूच येतील , कुठल्याकुठे उड्या  मारतील , असली कौशल्ये शिकायला त्यांना कुठल्या युनिवर्सिटीत जावे लागत नाही . मी तर एका मांजराला पंचवीस -तीस  फुटांवरून उडी मारताना प्रत्यक्ष बघितलंय . इतकी उडी घेऊनही खाली पोचल्यावर मात्र ते तसंच आरामात गेलं , काहीच न घडल्यासारखं ! बारा घरचं  दूध प्यायल्यामुळे हे अचाट शरीरसामर्थ्य त्यांच्यात येत असावं . 

'मांजर' हा शब्द वऱ्हाडी  भाषेत कायम स्त्रीलिंगी आहे तर प्रमाण का पुस्तकी भाषेत तो नपुंसकलिंगी आहे . पण मांजरावर त्यामुळे  काही फरक पडणार नसतो . आमच्या शाळेच्या वर्गात एक मांजरीसारखे डोळे असणारी मुलगी होती . एखादीचे मासोळीसारखे डोळे असतील तर तिला मीनाक्षी  म्हणतात , हरिणीसारखे असतील तर मृगनयना वगैरे वगैरे . त्यामुळे मांजरीशी संबंधित एखादं संस्कृतोद्भव नाव तिला द्यायला काय हरकत होती ? पण आमच्या मित्रांनी तिचं  नाव ठेवलं 'बोक्या ' .  हा लिंगबदल तिचे डोळे अन शरीरयष्टी ( हा फारच सडपातळ शब्द झाला) या दोहोंकडे पाहून करण्यात आला हेही जाता जाता सांगायला हवं . 

आपल्याकडे मात्र मांजरांना कायम हिडीसफिडीस करण्यात येतं . बरोबर आहे , जिथे अर्धअधिक  बालपण दुधासाठी तरसते तिथे असलेले दूध पळविणाऱ्याला कोण थारा  देईल ? आपल्या प्राणीप्रेमींच्या लेखी कुत्रे हेच फक्त प्राणी आहेत . माणसांसकट  इतर सर्व जणू उगाचच जन्माला आलेले आहेत.  पण बाहेरच्या देशात मात्र तसं  नाही .  इजिप्तमध्ये तर काळे मांजर फार पूज्य आहे . परदेशात तर खास मांजरांसाठी Fashion Show आयोजीत करतात . त्यात कशी छान मांजरं  असतात , काळी , भुरकी , पांढरी , लुकडी, गुबगुबीत , काही ग्रास कट केलेली तर काही केसाळ ; विविध रंगांची  विविध ढंगांची अन त्यांचे मालकही त्यांना हौसेने सजवतात . खरोखरच्या Cats , Catwalk  वर चालताना फार छान दिसतात म्हणे ! पण या शोमध्ये काही 'वस्त्रगळ ' होत नसल्याने आपल्याला बातमी जर उशिरा मिळते इतकंच . 

एकदा  'अपशकुनी ' अशी घंटा  मांजराच्या गळ्यात बांधून आपण मोकळे झाल्यामुळे आपल्या साहित्य , नाट्य , चित्रपटातून ते डोकावलच तरी ही घंटा  बांधूनच . याउलट हॉलीवूड बघा . केवळ मांजरींचेच  नव्हे तर बहुसंख्य प्राण्यांचे भावविश्व उलगडणारे अनेक चित्रपट तेथे तयार होतात .  उंदीर - मांजराच्या  सनातन वैरावर आधारलेलं  Tom & Jerry कार्टून  कुणी पाहिलं  नसेल असं  म्हणणं  धाडसाचं  ठरेल . त्यात प्रत्येक वेळी  Jerryच  वरचढ ठरतो , पण शंभरदा मार खाऊनही  Tom चं  ते लढाईला पुन्हा पुन्हा उभं राहणं मला जास्त  शूरपणाचं लक्षण  वाटतं . 

लहानपणीचा थोडा काळ सोडला तर ज्या मांजराला  आपण जन्मभर तुसडेपणाने  वागवलं , पळवून लावलं  तेच जर चुकून  मेलं  तर म्हणे काशीला जाऊन सोन्याचं  मांजर अर्पण करायचं ; वा ! पण एवढ एक काम तरी पूर्वजांनी चांगलं केलं  नाहीतर मांजरांची गात केव्हाच शेळ्या कोंबडयासारखी  आणि वाघ बिबट्या या जातभाई सारखी झाली असती . 

असं  म्हणतात  की  चोरून दूध पिताना मांजर आपले डोळे मिटून घेते.  त्याला वाटते आपल्याला काही दिसत नाही म्हणजे आपल्याला कुणी बघत नाही . ही खरी कलंदरी वृत्तीच मांजराला इतरांपासून वेगळं करते . लोकांनी त्याला ' घी देखा लेकिन बडगा  नही देखा ' म्हणून कितीही हिणवलं तरी ते बदलणार नाहीये . कारण बाहेरच्या जगात काही पाहण्यासारखं  नाही  हे त्याला कधीच कळून चुकलंय  आणि आपल्याला  ?


-अभिषेक अ. वाघमारे 

(पूर्व प्रकाशित)

 Sunday, 10 February 2013

आर्ट ऑफ लिविंग

शांतता आहे .....किर्र शांतता आहे.....

जरा कुठे खट्ट नाही
जरा कुठे खुट्ट नाही
पायाखाली झुरळ दुसरे
मेले तरी दु:ख नाही

भरली टम्म  माझी पोतडी
नाण्यांचाही आवाज नाही
मातीत मिसळू जाणाऱ्यांचा
नाद नाही वाद नाही

सगेसोयरे चंबू गबाळे
उचलून घ्यावे चूपचाप 
हळूच घुसावे कुणाआधी
जागा मिळे आपोआप

कुठे वाजती ढोल नगारे
कुणाकडे सुतकी वारे
याचा त्याचा प्रत्येकाचा
थोडा थोडा खावा घास


एक फूल दोन अक्षता
प्रसाद घ्यावा येता  जाता
सौदा करावा फायद्याचा
हवे तेच मग वरदान


- अभिषेक