Friday, 14 October 2011

कुलूपबंद

पेला खरं म्हणजे पूर्ण भरलेला आहे.
पण तरी तो सुद्धा काही वेळा आपल्याला  पूर्ण रिकामा दिसतो...
 नेहमी बघणाऱ्याच्याच  दृष्टीकोनात  दोष असतो असं काही नाही. 

पाणीच तितकं नितळ असतं, निर्मळ असतं.

पण बघणाऱ्याचे नशीब , तो नजरेवर विश्वास ठेवतो आणि ....फसतो.

पाण्याने भरलेल्या पेल्याच्या जडत्वाचे , वस्तुमानाचे अस्तित्व तो जाणू शकत नाही
काठोकाठ भरलेल्या पेल्यातील पाण्याच्या पृष्ठभागावर  नैसर्गिक बाष्पीभवन झाल्याने निर्माण झालेली छोटीशी वाफ ,त्याने निरखून पाहिली असती तर त्याला नक्कीच दिसली असती

सभोवतालच्या सगळ्या गोष्टींचा कानोसा घेऊन पुढे सरकण्याची आपली जंगलातली सवय आपण केव्हाच विसरून गेलो आहोत. शिवाय चटकन निर्णय घेण्याची घाई. 

ऐकीव गोष्टींवर आपला पूर्वीपासून विश्वास. पेल्याच्या गोष्टीत - तो एकतर अर्धा भरलेला असतो किंवा अर्धा रिकामा असतो - एवढंच आपल्याला माहित असतं. त्यापलीकडे आपण विचारच करू शकत नाही.

पुस्तकांच्या पलीकडे प्रात्यक्षिकांची दुनिया आहे. आम्ही कधी तिच्या कुलुपावरून धूळ झटकलीच नाही.

 पेल्यात वाकून पाहिल्यावर आपल्याला त्याचा तळ दिसतो- आपल्या वेड्यावाकड्या चेहऱ्याचे सरळ प्रतिबिंब दिसतं- आपण लगेच जाहीर करतो -  हा पेला तर रिकामा आहे......हा ! हा ! हा !

नक्की रिकामं काय आहे ?


आपण विज्ञान आचरु शकत नाही.

------ अभिषेक 

No comments:

Post a Comment