Saturday, 16 April 2011

उद्याची बात

                   उद्याची बात ! ! !

रोज नवी वाट चालतो एक नव्या उद्याची
प्राचीच्या वेशीवरती नांदी नव्या सुखाची

कालचे उःश्वास कधीच विरले विस्मृतीच्या धुक्यात
उद्याची शीतल झुळूक वाहे आज नसानसात
वेडी स्वप्ने मन हे चितारी एक नव्या जगाची
रोज नवी....

आता कसली चिंता अन् कसली आली वंचना
कालचे खाते कालच बंद,उद्या एक नवी रचना
उद्याच्या स्वागताची असे तयारी मम मनाची
रोज नवी...

पडद्यावर असेल दृष्य नवे अन् नवनवे देखावे
कवितेच्या ओळीनेही मग श्वास ताजे घ्यावे
नव्या पाटीवर हसतील अक्षरे उद्या नव्या कवितेची
रोज नवी....

उद्या तर येणारच आहे ,मी असलो वा नसलो जरी
गीते उद्याची गाईन कुणी,टिकवून माझा वारसा उरी
मैफिल अशीच रंगात नहावी आशेच्या गजलांची
रोज नवी ...

अभिषेक वाघमारे
२००६

No comments:

Post a Comment