Tuesday, 19 April 2011

मावळती

मावळती...............


अस्तित्वाच्या खाणाखुणांना रोज पुसतो आहे
चिमणीतला धूर बनून रोज सटकतो आहे

पण पुसलेल्या खुणा या पुन्हा कशा उमटतात
अखेरची अंतवाट पुन्हा  का  लपवतात

पण शेवटी वाट मिळाल्यावर पाश का हे तुट्त नाहीत
आठवणींचे नीरस रंग काविळीसारखे उतरत नाहीत

मग होतो सैरभैर, उत्तररात्रीच्या वार्‍यासारखा
’असतो’ मी, पण एकटा, दूरच्या त्या तार्‍यासारखा

शेवटी आता जातो आहे शरण त्या महान तत्वाला
मावळतीचे रागच आहेत आता फक्त सोबतीला

या साथीसोबतच भैरवी मी आळवतो आहे
पहिलं अन्‌ अखेरचचं बोलणं आता आवरतो आहे

-अभिषेक

Saturday, 16 April 2011

उद्याची बात

                   उद्याची बात ! ! !

रोज नवी वाट चालतो एक नव्या उद्याची
प्राचीच्या वेशीवरती नांदी नव्या सुखाची

कालचे उःश्वास कधीच विरले विस्मृतीच्या धुक्यात
उद्याची शीतल झुळूक वाहे आज नसानसात
वेडी स्वप्ने मन हे चितारी एक नव्या जगाची
रोज नवी....

आता कसली चिंता अन् कसली आली वंचना
कालचे खाते कालच बंद,उद्या एक नवी रचना
उद्याच्या स्वागताची असे तयारी मम मनाची
रोज नवी...

पडद्यावर असेल दृष्य नवे अन् नवनवे देखावे
कवितेच्या ओळीनेही मग श्वास ताजे घ्यावे
नव्या पाटीवर हसतील अक्षरे उद्या नव्या कवितेची
रोज नवी....

उद्या तर येणारच आहे ,मी असलो वा नसलो जरी
गीते उद्याची गाईन कुणी,टिकवून माझा वारसा उरी
मैफिल अशीच रंगात नहावी आशेच्या गजलांची
रोज नवी ...

अभिषेक वाघमारे
२००६