Sunday, 27 November 2011

अभी नही तो कभी नही


अभी नही तो कभी नही
 स्थळ : नाशिकातील एक शॉपिंग सेंटर वजा मॉल वजा मल्टिप्लेक्स वजा हॉटेल इ.इ दिनांक: २ ऑक्टोबर २०११

काळ : उलटून गेलेला

उत्तरार्ध :
मी Crossword  मध्ये पुस्तकं चाळत असतो. माझं नाशिक किंवा असंच जुन्या नाशिकची माहिती असणारं पुस्तक.
पुस्तक चाळता चाळता एका  जुन्या ब्लॅक & व्हाईट फोटोवर माझी नजर थांबते.
 देव आनंदला पहायला जमलेली गर्दी
मी गुपचूप पुस्तक मिटतो आणि बाहेर पडतो .
माझ्या शो-ची वेळ झाली असते.


पूर्वार्ध :
मी नाशिकच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत स्पेशल रिक्षाने , धावत पळत थिएटरला पोचतो..
तिकीट खिडकी तशी रिकामीच असते.
चार्जशीट चं १२:३० चं एक तिकिट द्या मी बुकिंग क्लर्कला फर्मावतो.
सॉरी सर, मिळणार नाही - काचेमागचा टापटीप मल्टिप्लेक्सछाप आवाज माईकमधून बोलतो.
का ?
शो cancel  झाला आहे.
क्काय ?, कसा ? थिएटरला जाऊन शोच cancel  होण्याची माझ्या आयुष्यातली पहिलीच वेळ.
अरे पण परवाच रिलीज झाला ना ?
बरोबर आहे सर तुमचं . देव आनंदची मूवी.....(एक तुच्छतापूर्वक pause) कोण बघणार ? बुकिंग क्लर्क जरा जागेवरून उठल्यासारखं करून मला न्याहाळतो. बहुधा  शुक्रवारपासून तिकिट मागायला आलेला पहिला जिवंत प्राणी मीच असावा.
आम्ही कालच पिक्चर उतरविला..
मग आता काय ? मी सगळ्या जगाला प्रश्न करतो.
तुंम्ही मौसम किंवा साहेब,बीवी और गँगस्टर बघू शकता.
मौसम बघायची माझी मानसिक तयारी नसते. मी निमूटपणे साहेब,बीवी और गँगस्टर चं तिकिट काढतो.
शोला जरा वेळ असतो. मी Crossword कडे वळतो.


-         अभिषेक  

Friday, 14 October 2011

कुलूपबंद

पेला खरं म्हणजे पूर्ण भरलेला आहे.
पण तरी तो सुद्धा काही वेळा आपल्याला  पूर्ण रिकामा दिसतो...
 नेहमी बघणाऱ्याच्याच  दृष्टीकोनात  दोष असतो असं काही नाही. 

पाणीच तितकं नितळ असतं, निर्मळ असतं.

पण बघणाऱ्याचे नशीब , तो नजरेवर विश्वास ठेवतो आणि ....फसतो.

पाण्याने भरलेल्या पेल्याच्या जडत्वाचे , वस्तुमानाचे अस्तित्व तो जाणू शकत नाही
काठोकाठ भरलेल्या पेल्यातील पाण्याच्या पृष्ठभागावर  नैसर्गिक बाष्पीभवन झाल्याने निर्माण झालेली छोटीशी वाफ ,त्याने निरखून पाहिली असती तर त्याला नक्कीच दिसली असती

सभोवतालच्या सगळ्या गोष्टींचा कानोसा घेऊन पुढे सरकण्याची आपली जंगलातली सवय आपण केव्हाच विसरून गेलो आहोत. शिवाय चटकन निर्णय घेण्याची घाई. 

ऐकीव गोष्टींवर आपला पूर्वीपासून विश्वास. पेल्याच्या गोष्टीत - तो एकतर अर्धा भरलेला असतो किंवा अर्धा रिकामा असतो - एवढंच आपल्याला माहित असतं. त्यापलीकडे आपण विचारच करू शकत नाही.

पुस्तकांच्या पलीकडे प्रात्यक्षिकांची दुनिया आहे. आम्ही कधी तिच्या कुलुपावरून धूळ झटकलीच नाही.

 पेल्यात वाकून पाहिल्यावर आपल्याला त्याचा तळ दिसतो- आपल्या वेड्यावाकड्या चेहऱ्याचे सरळ प्रतिबिंब दिसतं- आपण लगेच जाहीर करतो -  हा पेला तर रिकामा आहे......हा ! हा ! हा !

नक्की रिकामं काय आहे ?


आपण विज्ञान आचरु शकत नाही.

------ अभिषेक 

Monday, 26 September 2011

सुचू नये अशी कविता

सुचू  नये अशी  कविता


माणूस असतो
माणूस नसतो 
आठवणींचा चिखल नासतो 

माणूस असतो
माणूस नसतो 
हुंदक्यांचा श्वास कोंडतो 

माणूस असतो
माणूस नसतो 
काळही त्यासोबत विझतो

माणूस असतो
माणूस नसतो 
पोकळीला शून्यही लाजतो

माणूस असतो
माणूस नसतो 
सुपातला पुन्हा हसतो 


- अभिषेक 
२४ सप्टेंबर २०११ 


Tuesday, 19 April 2011

मावळती

मावळती...............


अस्तित्वाच्या खाणाखुणांना रोज पुसतो आहे
चिमणीतला धूर बनून रोज सटकतो आहे

पण पुसलेल्या खुणा या पुन्हा कशा उमटतात
अखेरची अंतवाट पुन्हा  का  लपवतात

पण शेवटी वाट मिळाल्यावर पाश का हे तुट्त नाहीत
आठवणींचे नीरस रंग काविळीसारखे उतरत नाहीत

मग होतो सैरभैर, उत्तररात्रीच्या वार्‍यासारखा
’असतो’ मी, पण एकटा, दूरच्या त्या तार्‍यासारखा

शेवटी आता जातो आहे शरण त्या महान तत्वाला
मावळतीचे रागच आहेत आता फक्त सोबतीला

या साथीसोबतच भैरवी मी आळवतो आहे
पहिलं अन्‌ अखेरचचं बोलणं आता आवरतो आहे

-अभिषेक

Saturday, 16 April 2011

उद्याची बात

                   उद्याची बात ! ! !

रोज नवी वाट चालतो एक नव्या उद्याची
प्राचीच्या वेशीवरती नांदी नव्या सुखाची

कालचे उःश्वास कधीच विरले विस्मृतीच्या धुक्यात
उद्याची शीतल झुळूक वाहे आज नसानसात
वेडी स्वप्ने मन हे चितारी एक नव्या जगाची
रोज नवी....

आता कसली चिंता अन् कसली आली वंचना
कालचे खाते कालच बंद,उद्या एक नवी रचना
उद्याच्या स्वागताची असे तयारी मम मनाची
रोज नवी...

पडद्यावर असेल दृष्य नवे अन् नवनवे देखावे
कवितेच्या ओळीनेही मग श्वास ताजे घ्यावे
नव्या पाटीवर हसतील अक्षरे उद्या नव्या कवितेची
रोज नवी....

उद्या तर येणारच आहे ,मी असलो वा नसलो जरी
गीते उद्याची गाईन कुणी,टिकवून माझा वारसा उरी
मैफिल अशीच रंगात नहावी आशेच्या गजलांची
रोज नवी ...

अभिषेक वाघमारे
२००६