Wednesday, 2 May 2018

आमचा पण पुस्तक दिन


आज सकाळी सकाळीच आपल्या बावळट बाळूला कळलं की आज पुस्तक दिन आहे ते. सकाळी सकाळी म्हणजे असं की त्याच्या फेसबुक क्रश मातकट माऊने रात्रभरात कुठकुठल्या पोस्टला लाईक केले हे बघायला त्याने गोपाळमुहुर्तावर फेस्बुक उघडल्यावर. पण ही प्रोसेस आम्ही जितकी सांगितली तितकी सहज नसते. ती समजण्यासाठी त्याआधी त्याने काय केलं हेही जाताजाता बघून घेऊ.

म्हणजे झोपेतून उठल्यावर त्याने आधी डोळे उघडले हे महत्वाचं. मग सुरभीवाल्यांनी ढिगातून पत्र काढावं तसं त्याने आंथरूण, पांघरूण, उशा एकत्र करत अंगाखालचा मोबाइल काढला. हे करताना शरीराच्या मध्यभागाची निरनिराळ्या कोनातली उचलखाचल झाल्यामुळे अनायसे योगाही घडून गेला. मग त्याने सेल्फी कॅमेरा ऑन करून आधी स्वदर्शन केलं. कालच केलेला स्पाइक कट नीट आहे की नाही ते पाहिलं (त्यासाठी तो उशीत तोंड न खुपसता सरळ निजला होता. काय करता, नाहीतर गेले दोनशे रुपये पाण्यात!). तो व्यवस्थित होता तरी केसात हात फिरवून स्पाइक अधिक टोकदार करून घेतला. डोळ्यातल्या चिप्पडांमुळे त्याला काही नीट दिसत नव्हतं, पण ब्रश केल्यावर पाण्याने ते निघणारच आहेत मग कशाला डोळे चोळा म्हणून मग शेवटी त्याने मिचमिचे डोळे करत मोबाइल स्क्रीनचा पडदा खाली ओढून नोटिफिकेशने पाहिली. ती पाहून बाळूला एवढंच कळलं की आज फेस्बुकवर कुठल्यातरी पुस्तकाचा फोटो काढून टाकणं आवश्यक आहे. कारण माऊने सुद्धा तसंच केलं होतं. माऊ लाइक्स धिस...माऊ लाइक्स दॅट वर कुणाकुणाच्या कसल्याकसल्या फोटोजला तिने लाइकलेलं होतं. बाळूने त्यातल्या तीन चार पुस्तकांची नावं वाचण्याचा प्रयत्न करून पाहिला. 
  
क्वार्टर टू सिक्स गर्लफ्रेण्ड’, माणूस महाढोंगी कसा बनला?’, शिंप्याच्या हातातून निसटलेली बॉबिन’, झरथ्रुष्ट्रांचा बहुराष्ट्रगामी इतिहास’, इंग्रजीमधून चोरा पटकन- एक साहित्यिक मार्गदर्शिका’, एक होता बार्बर असली नावं वाचून बाळू नखस्पाईकांत हादरला. आपण वर्गात मागच्या बेंचावर बसत असल्याने जगाच्या मागे तर पडत नाही आहोत ना असाही एक साहित्यिक विचारही त्याच्या कुमारमनाला चाटून गेला. त्यामुळे रासवट राऊने (हा बाळूचा स्पर्धक, तज्ज्ञ वाचकांच्या लक्षात आलंच असेल) चान्स मारायच्या आत काहीतरी हालचाल करणं त्याला क्रमप्राप्त वगैरे होतं. (रासवट राऊ लेकाचा खूपच लौकर उठतो साला!). मग त्याने हालचाल केली. एकदा मान डावीकडे वळवली. एकदा उजवीकडे वळवली. एक लांब आळस दिला. मग अंगावरचं पांघरूण पायातली चप्पल फेकावी तसं स्टाईलने टुणकन् उडवून पलंगाबाहेर टोलवलं. आता तो पूर्णपणे उठला होता.

त्याने आधी शाळेची सॅक उपसली. त्यातली पुस्तकं चाळली. पण शाळेच्या सगळ्या पुस्तकांना कव्हरं घातली होती. फेस्बुकवर ते चालणार नव्हतं. पुस्तकाचं कव्हर दिसणं महत्वाचं, इतकं तर त्याच्याही ध्यानात आलं होतं, बावळट असला म्हणून काय झालं? किंवा एका फोटोत न मावणारी खूप पुस्तकं असतील तर त्या पुस्तकांची थप्पी करून त्याचा पिक काढायचा असंही त्याला कळलं होतं. प्रोव्हायडेड, त्या पुस्तकांच्या बाइंडींगवर छापलेलं नाव दिसलं पाहिजे. म्हणजे पुस्तकं तेवढी जाड हवीत. आता इतकी जाड पुस्तकं कुठनं आणायची? त्याने बाबांना कित्येकदा म्हटलं होतं की आपण एक छान बुक्केस आणि त्यात ठेवायला पुस्तकं घेऊ बरं. माऊकडे बघा किती छान बुक्केस आहे ती! तसे बाळूचे बाबा त्याचे अगदी फ्रेण्डसारखेच होते. कारण दुष्मन का दुष्मन अपना दोस्त होता है, दोघंही अक्षरशत्रू! मग ते काय ऐकताहेत.

खूप विचकवाचक केल्यावरही त्याला एकही चांगलं पुस्तक मिळालं नाही. शेवटी थकून तो पलंगावर पडला तेव्हा आपल्याच फेस्बुक प्रोफाइलचा स्क्रीनशॉट काढून पोस्ट करावा असाही विचार त्याच्या मनात आला. कारण शेवटी फेसबुकमध्येही एक बुक आहेच ना! पण नको, खरंखुरं पुस्तकच हवं म्हणून त्याने तो विचार रहित केला.

पडल्यापडल्या त्याची नजर माळ्यावर गेली. तिथे एक जुनी हॅण्डलतुटकी कुलुपलेस ब्रीफकेस पडली होती. त्याचे डोळे चमकले. तो टुणकन् उठला. खुर्ची खर्रखर्र ओढली. चढला. तरी त्याची उंची पुरत नव्हती. मग पत्रपेटीत हात घालावा तसा टाचांवर उभं राहून त्याने त्या ब्रीफकेसमध्ये हात घातला. हातानेच आतल्या वस्तूंची चाचपणी केली. आत खूप कागद, जुन्या फायली होत्या. शेवटी त्याच्या हाताला पुस्तकासारखं काहीतरी लागलं. ती डायरी निघाली, शिट! मग त्याने पुन्हा चाचपडलं. आता त्याच्या हातात खरोखर एक पुस्तक लागलं. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. ते बाबांचं एक जुनं पुस्तक होतं. ती ब्रीफकेस तशीच वासत सोडून त्याने खाली उडी मारली.

खिडकीवरचा पडदा बाजूला करून उजेड केला. पटकन त्या पुस्तकाचा एक पिक काढून फेस्बुकवर शेअर केला. ते करताना आजची खरेदी.. हॅप्पी पुस्तक डे अशी कमेंट टाकायला तो विसरला नाही. चला, दिवसाची सुरुवात तर चांगली झाली म्हणून त्याचा जीव भांड्यात पडला. मग तो समाधानाने टॉयलेटमध्ये गेला.

इकडे मातकट माऊसुद्धा ऑनलाईन होतीच. तिनेही लगेच बाळूचा अपडेट पाहिला आणि त्याने पोस्ट केलेल्या जय जय भिकाराम ग्रामीण बिगरशेती बहुउद्देशीय सहकारी पतसंस्थेच्या खाते पुस्तकाच्या फोटोवर लोल हसत कमेंट केली.

“अरे...बावळटा!...”
      ****

(चित्रसौजन्य: पिंट्रेस्ट)

Sunday, 25 March 2018

"सी...सिनेमाचा" अर्थात C for Cinemaमित्रहो,
"सी...सिनेमाचा" अर्थात C for Cinema हे माझे पहिलेच ई-बुक आपल्यापुढे सादर करताना अतिशय आनंद होतो आहे.
ई-बुक च्या विश्वात हा माझा पहिलाच प्रवेश.
समकालीन हिंदी-इंग्रजी-मराठी चित्रपटांची नेहमीची मळलेली वाट टाळून केलेली ही आस्वादक समीक्षा. निव्वळ सरधोपटपणे चित्रपटांच्या कथा जशाच्या तशा सांगणारी ही पाल्हाळिक समीक्षणे नाहीत की प्रत्येक वेळी 'पाहावा की न पाहावा' प्रकारचे सल्ले देणारीही ही परीक्षणे नाहीत. तर ही आहेत आर या पार मते, चित्रपट पाहून जे वाटले ते प्रामाणिकपणे मांडणारी.
माझे चित्रपटविषयक लेख आपण याआधी इतरत्र वाचले असतील. त्यातलेच काही निवडक लेख इथे एकत्र केले आहेत.
प्रस्तुत पुस्तकाचा लेखक, संपादक, मुद्रितशोधक इ. मीच असल्याने काही उणीव भासल्यास नि:संकोच कळवावी ही विनंती
हा नवा प्रयोग आपणास आवडेल या आशेसह आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत,
आपलाच,
अभिषेक अनिल वाघमारे
**************************
ई- बुक खरेदी करण्याचेे व वाचण्याचे मार्ग:
महत्वाचे: हे पुस्तक वाचण्यासाठी तुमच्याकडे Amazon Kindle Device किंवा ते नसल्यास स्मार्टफोन/ टॅबमध्ये Kindle हे अ‍ॅप असणे आवश्यक आहे. आता खाली वाचा.
१. Amazon.in वरची डायरेक्ट लिंक: https://tinyurl.com/y9hjvgn4
२. तुमच्या कडे आधीच Amazon Kindle Unlimited चे subscription
असल्यास कुठल्याही डिव्हाईस वर मोफत
३. Kindle Device असणार्‍यांसाठी थेट Kindle Store मध्ये Abhishek Anil
Waghmare किंवा C for Cinema या नावाने सर्च करा.
४. Smartphone वर वाचण्यासाठी तुमच्या प्ले स्टोअर/ अ‍ॅप स्टोअर मधून
Kindle हे अ‍ॅप डाउनलोड करा व आपल्या अ‍ॅमॅझॉन आयडीने लॉग इन
करून वरील प्रमाणे सर्च करा.

Monday, 13 November 2017

‘डर’ –एक भयकथा !

 

'डर' –एक भयकथा !
असं म्हणतात की झुरळ हा प्राणी  फारच प्राचीन  आहे. प्रागैतिहासिक का कुठल्याश्या  काळापासून तो पृथ्वीवर वास्तव्य  करून आहे. मानव तर तसा 'आनी-जानी'  आहे म्हणा. पण झुरळं मात्र माणसांच्या आधीपासून होती आणि माणसांच्या नंतरही राहणार आहेत असं आम्ही कुठेतरी वाचलंय. पण य:कश्चित झुरळाला इतकी सिनिअ‍ॅरिटी देऊन त्याचं 'प्रतिमासंवर्धन' करणं काही आम्हाला पटत नाही. मग या झुरळांपेक्षाही जुनं काय असावं जे आजही आपल्या आजूबाजूला सर्व चराचर व्यापून आहे थोडं डोकं खाजवल्यावर लक्षात आलं की- आहे ! अशी एक गोष्ट आहे जी या पृथ्वीवर फडतूस झुरळांपेक्षाही जुनी आहे ती म्हणजे  भय, भीती किंवा डर ! 

Saturday, 4 June 2016

मार्कर

एकूण एक केस 
उपटलाय बघ 
छातीवरचा
घे, हे नाव
कोर आता
पण
जरा थांब
वापरू नकोस
तो परमनंट मार्कर
नाहीतर,
याच नावाची दुसरी
शोधावी लागेल मला
हिनेही
नाही म्हटलं  तर
 

Thursday, 7 April 2016

बाहुबलीला पुरस्कार आणि काहींची पोटदुखी

बाहुबलीला पुरस्कार आणि काहींची पोटदुखी


मी आजवर बाहुबलीबद्दल लिहायचं मुद्दामच टाळलं होतं. भारतीय सिनेमाच्या इतिहासातील या ऐतिहासिक ठरू शकणार्‍‍या सिनेमाबद्दल तथाकथित बॉलीवूड आणि स्वघोषित बुद्धिजीवींची काय प्रतिक्रिया येते याची मला उत्सुकता होती. आणि सांगायला अत्यंत आनंद होतो की दोघांनीही मला अजिबात निराश केलं नाही. दोघांनीही 'बाहुबली' सिनेमागृहात चालू असताना व तो उतरल्यावरदेखीलही सतत त्याला अनुल्लेखाने मारण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे बाहुबलीला नुकताच जाहीर झालेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार.